माहीम सार्वजनिक वाचनालय  (स्थापना - १५ मे १९७७)
नोंदणी क्रमांक - मुंबई - ६५ / १९९६ जी. बी. बी. एस. डी.
Menu
|| वाचनालयाचा इतिहास ||
१९०७ साली दादर सार्वजनिक वाचनालय अस्तित्वात आले. त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे १९७७ ला माहीम भागात दादर सार्वजनिक वाचनालयाची एक शाखा सुरू झाली. एप्रिल १९९६ ला हे वाचनालय दादर सार्वजनिक वाचनालयापासून तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या वेगळे आणि स्वावलंबी झाले, वाचनालयाला स्वायत्तता मिळाल्याने माहीम सार्वजनिक वाचनालयाला स्वत:चे व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले असेही म्हणता येईल.



दादर सार्वजनिक वाचनालय आणि धुरू हॉल ट्रस्टस यांनी एक सभा घेऊन घेतलेल्या निर्णयानुसार वाचनालयाचे हे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. विभक्त होऊनही आज माहीम वाचनालयाचे या दोन संस्थांशी स्नेहाचे आणि सहकार्याचे नाते आहे हे इथे मुद्दाम नमूद करायला हवे.


माहीम सार्वजनिक वाचनालयाला आज जे गौरवाचे स्थान प्राप्त झाले आहे त्यामागे कै. राजाराम दत्तात्रय ब्रम्हे, कै. दत्तात्रय अत्रे आणि त्यांचे सेवाभावी सहकारी यांचे अपार परिश्रम कारणीभूत आहेत. वाचनालयाचे शिल्पकार म्हणून या कर्तृत्ववान मंडळींचा गौरवाने उल्लेख करावा लागेल.

वाचनालयाच्या विकासाला कै.कुसुम देशमुख,श्री.माधव आठवले, श्रीमती ललिता कुलकर्णी, श्री.अनंत आत्माराम चोडणकर, कै.विमल वागळे, कै.शरयू भोपटकर, कै.सदाशिव शांताराम दातार, श्रीमती वसुधा जोगळेकर,श्रीमती आशा धारप, श्री. मिलिंद टेंबे,श्रीमती संगीता पाटणकर,कै.प्रभा राऊत,कै.मृणालिनी गजेंद्रगडकर,श्री.दिलीप कोरे,श्री.कमलाक्ष महाले,श्रीमती वर्षा प्रभू,श्री.चंद्रकांत कारखानीस,श्री.गिरीश बक्षी या मंडळींचा, मेहनती कर्मचाऱ्याचां आणि वाचनप्रेमी सदस्यांच्या मार्गदर्शनाचा देखील हातभार लागला आहे.

वर्तमान माहीम सार्वजनिक वाचनालय हे आज केवळ एक वाचनालय नाही तर दादर माहीम विभागातले एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र बनून गेले आहे. 


वाचनालयाची सदस्यसंख्या प्रतिवर्षी वाढत जाऊन आता १५०० वर पोहोचली आहे. मुक्त वाचनालयाला मिळणारा प्रतिसादही वाढत चालला आहे. एकूण २२ नियतकालिके वाचनालयात उपलब्ध असतात. वाचकांचा कल, आणि आवड लक्षात घेऊन नियतकालिकांची निवड केली जाते. याखेरीज विनंतीनुसार अभ्यासकांसाठी संदर्भग्रंथही उपलब्ध करून दिले जातात. 

वाचनालयात आजमितीला ७५५ संदर्भग्रंथ आहेत. वाचनालयाची एकूण ग्रंथसंपदा आज ५१५०० च्या घरात पोहोचली आहे. संगणक आणि दूरध्वनीचा वापर करून वाचक आपल्या निवासस्थानातून पुस्तकाच्या उपलब्धतेविषयी विचारणा करू शकतात . पुस्तकवाचनाची मुदत वाढवून घेऊ शकतात. नव्या पुस्तकांची नावे सुचवू शकतात,वाचनप्रेमींच्या सूचनांवर वेळोवेळी वाचनालयाच्या कार्यकारिणीच्या मासिक सभेत विचार केला जातो.

व्यवहार्य सूचना स्वीकारल्या जातात. यानुसार वाचनालयाच्या कामकाजात आवश्यक बदल घडवून आणले जातात. सभेच्या संमतीने वाचकांनी सुचवलेली नवी पुस्तकेही खरेदी केली जातात.

ज्येष्ठ नागरिकांना घरपोच पुस्तक देवाणघेवाण सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून १० वर्षांपूर्वी *ग्रंथालय तुमच्या दारात* उपक्रम सुरू केला त्यालाही भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. ग्रंथालय तुमच्या दारात या उपक्रमाची संख्या १२७ आहे.


वाचनसंस्कृती संवर्धन कार्य उत्तम वाचनालयाचे कार्य पुस्तकांची देवाणघेवाण आणि मुक्त वाचनाची सोय उपलब्ध करणे एवढेच नाही; तर वाचन-समृद्धीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हेही वाचनालयाचे कर्तव्य आहे आमच्या वाचनालयाच्या संचालकांना आणि कार्यकारिणीला याचे भान असल्याने वाचनालयातर्फे विविध उपक्रम आणि कार्यक्रम हाती घेण्यात येतात.

वाचनात समग्रता यावी म्हणून साहित्याच्या विविध दालनांची ओळख करून देणारे चर्चात्मक कार्यक्रम, आवडत्या लेखकाशी गप्पागोष्टी, विशिष्ट वाङ्मयीन विषयावर, गाजलेल्या साहित्यकृतीवर किंवा वाचकप्रिय साहित्यिकांच्या योगदानावर आपसांत खुली चर्चा घडवण्यासाठी आयोजलेल्या वाचकसभा, वाचकांच्या लेखनगुणांना वाव देणारी भित्तिपत्रके, बालवाचकांसाठी प्रश्नमंजुषा, पथनाटय स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, बालसाहित्य जत्रा, कर्ण-बधिर मुलांसाठी कथाकथन स्पर्धा,गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सोय हे त्यांपैकी काही उल्लेखनीय उपक्रम!


विशेष अभिमानास्पद घटना

२००५-२००६ चा महाराष्ट्र राज्य पुरस्कृत उत्कृष्ट ग्रंथालयासाठीचा डॉ, बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार !

२०१० साली वाचनालयास राज्य सरकारचा इतर अ दर्जा प्राप्त.

वाचनसंस्कृती क्षेत्रातले वाचनालयाचे योगदान लक्षात घेऊन मुंबई महापालिकेतर्फे दिलीप गुप्ते मार्ग आणि वीर सावरकर मार्ग यांना जोडणाऱ्या  रस्त्याचे माहीम सार्वजानिक वाचनालय मार्ग असे नामकरण.

२०१२ साली वाचनालयाच्या सत्तर टक्के कामकाजाचे आणि पुस्तक देवाणघेवाण व्यवहाराचे संगणकीकरण. अभिनव उपक्रम आणि थोरामोठया पाहुण्यांचा सहभाग. आजवर अनेक मान्यवरांनी वाचनालयाला भेट दिली आहे.

माहीम सार्वजनिक वाचनालय - माहीम
स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाने शिवाजीपार्कहून माहीमकडे निघालात की हिंदुजा इस्पितळाच्या आधी उजव्या फुटपाथला 'माहीम सार्वजनिक वाचनालय मार्ग' नावाची पाटी असलेला एक लहान रस्ता लागेल. त्या मार्गाने दिलीप गुप्ते मार्गाकडे निघालात की डाव्या वळणावर जी इमारत दिसेल ती आमच्या माहीम सार्वजनिक वाचनालयाची इमारत. आधी दादर वाचनालयाची माहीम शाखा म्हणून हे वाचनालय ओळखले जायचे. आज आमच्या वाचनालयाचे नाव माहीम सार्वजनिक वाचनालय आहे.
© Mahim Sarvajanik Vachanalay, Mahim. All rights reserved.
Powered by TantraVed Jalgaon